Wellcome

हमे आज भी सस्ती चिजो का शौक नही सपने बेचने वालो की खामोशीया भी उनके लफ्जो से ज्यादा महँगी होती है |

Saturday, October 3, 2020

स्वताचा आदर

लोकांचे भले करायचे याचा अर्थ हा नाही की आपण आपलेच आयुष्य खराब करून घ्यायचे. लोकांबरोबर चांगले वागायचे याचा अर्थ हा आहे ते म्हणजे आपल्यापासून कोणाचे मन दुखावले जाऊ नये. आपल्यामुळे कोणाचे वाईट होऊ नये. तुम्ही जर लोकांबरोबर चांगले वागत असाल, त्यांचे भले करायचे प्रयत्न करत असाल तरी सुद्धा तुम्हाला अवहेलना सहन करावी लागत असेल, लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असेल, तुमचा विश्वासघात होत असेल तर त्याची पाच मुख्य कारणे असू शकतात. जर तुम्ही या 5 गोष्टींना व्यवस्थित समजून घेतले तर तुमच्याबरोबर शक्यतो कधीच चुकीचे होणार नाही.

१) पहिले कारण, तुम्ही नेहमी उपलब्ध असता. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी नेहमी उपलब्ध असाल, नेहमी हाजीर असाल तर ती लोक कधीच तुमचा आदर करणार नाहीत. कारण त्यांना माहिती असते तुम्ही नेहमी तयार बसलेले असता. ते जेंव्हा म्हणतील तेंव्हा तुम्ही त्यांची मदत करायला तयार असता. प्रत्येक व्यक्तीला आपली अशी उपलब्धता देऊ नका. जर आपले आई-वडील असतील किंवा आपली बायको-मुले असतील तर त्यांच्यासाठी आपण नेहमी उपलब्ध असलेच पाहिजे. किंवा अशी काही व्यक्ती असतील ज्यांनी आपली अनेकवेळा मदत केली असेल अश्या लोकांसाठी उपलब्ध असणे चांगले आहे. पण प्रत्येक व्यक्तीसाठी आपण नेहमी उपलब्ध राहिलो तर आपला कुणीच मान सन्मान करणार नाही. आपल्याला लोक गृहीत धरतील. याचा अर्थ हा पण नाही की आपण अजिबातच वेळ देऊ नये. वेळ दिला पाहिजे पण फक्त कामपूरता.

२)दुसरे कारण, अति काळजी घेणे. जेंव्हा एखाद्या व्यक्तीची आपण अति काळजी करतो तेंव्हा हे समजू नका की त्याला खूप चांगले वाटते. ही अती काळजी करण्याची सवय समोरच्याला त्रासदायक ठरू शकते. आपण आपल्या जवळच्या व्यक्तींची काळजी घेतलीच पाहिजे पण प्रमाणापेक्षा जास्त काळजी केली तर समोरचा निष्काळजी होतो. त्यामुळे आपल्याला इथे सुद्धा संतुलन बनवता आले पाहिजे. नाहीतर इथे सुद्धा लोक आपल्याला गृहीत धरायला सुरुवात करतात. आणि मग लोक आपल्या भावनांचा सन्मान करत नाहीत.

३)तिसरे कारण, अति आदर करणे. जेव्हा आपण एखाद्याचा अती आदर करतो, प्रमाणापेक्षा जास्त आदर करतो तेव्हा त्या लोकांची अशी समजूत होते की तुमचे स्वतःचे असे काही अस्तित्वच नाही. तुमची स्वतःची अशी काही किंमतच नाही म्हणूच तुम्ही त्यांच्यासमोर एवढे झुकले आहात. एवढे पण एखाद्या समोर झुकू नका की लोक तुम्हाला गृहीत धरायला सुरुवात करतील. कुठे झुकायचे आणि कुठे मान ताठ ठेवायची याची समज आपल्याला आली पाहिजे. जी योग्य व्यक्ती असेल ना ती तुम्हाला कधी झुकूच देणार नाही. पण तुम्ही असेच सगळ्यांचा अती आदर करत राहिलात, सगळ्यांसमोर झुकत राहिलात तर तुमचा कधीच कोणी आदर करणार नाही. आणि लोक या तुमच्या चांगुलपणाचा नेहमी फायदा उठवत राहतील.

४)चौथे कारण, अति प्रेम करणे. तसे पहायला गेले तर प्रेम हे आयुष्य खूप सुंदर बनवते, आनंदी बनवते. पण हेच प्रेम जर चुकीच्या माणसावर केले तर ते आयुष्य खराब करते. जी व्यक्ती तुमच्या प्रेमाच्या लायकीची नाही आणि त्याच व्यक्तीवर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त प्रेम करता तेव्हा तीच व्यक्ती तुम्हाला पावलोपावली रडवते. ती व्यक्ती तुम्हाला फक्त दुःख आणि वेदना देत रहाते. जी व्यक्ती खरच तुमच्या प्रेमाच्या लायकीची असेल ना तर ती कधीच तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ देणार नाही, तुम्हाला कधीच दुःख देणार नाही. पण जर ती व्यक्ती तुम्हाला सतत रडवत असेल, तुम्हाला दुःख देत असेल तर समजून जा की तुम्ही अश्या व्यक्तीवर प्रमाणापेक्षा जास्त प्रेम करत आहात जी त्या प्रेमाच्या लायकीची नाही. मी असे म्हणत नाही की तुम्ही प्रेम करू नका. तुम्ही प्रेम नक्की करा पण समोरच्याच्या योग्यतेनुसार, नाहीतर त्रास तुम्हालाच होईल.

५)पाचवे कारण, स्वतःच्या जिवनात दुसऱ्याला प्रमाणापेक्षा जास्त अधिकार देणे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त अधिकार देता तेव्हा ती लोक तुमच्या वयक्तिक आयुष्यात ढवळा ढवळ करायला सुरुवात करतात. तुमच्या प्रत्येक गोष्टीत ते शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात. कोणालाही एवढा अधिकार देऊ नका की कोणीही येऊन तुम्हाला काहीपण बोलून निघून जाईल. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये लोकांसाठी काही मर्यादा ठेवा.

लोकांमध्ये ठरावीक अंतर ठेवा जेणेकरून ते तुमचा आदर सुद्धा करतील आणि तुमच्या वयक्तिक आयुष्यात ढवळा ढवळ सुद्धा करणार नाहीत.  मित्रांनो या 5 गोष्टींची जीवनामध्ये अंमलबजावणी केली तर कोणीही तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेणार नाही. लोक तुमचा आदर पण करतील आणि तुमची काळजी सुद्धा घेतील. आणि तुमच्याबरोबर कोणाला वाईट वागायची संधी सुद्धा मिळणार नाही. www.vinoddahare.com

No comments: